पुणे: सासरच्या छळास कंटाळून महिलेची विहीरीत उडी मारून आत्महत्या; सासरच्यांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. २४ मे २०२१: – सासरच्या छळाला कंटाळून महिलेने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वाडेबोल्हाईतील शिंदे वस्ती येथे २० मे रोजी घडली. याप्रकरणी महिलेचा पती आणि सासू-सासऱ्यांविरूद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलम धोंडिबा शिंदे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नवरा धोडिंबा भाऊसो शिंदे सासू हिराबाई भाऊसो शिंदे आणि सासरा भाऊसो बापू शिंदे (सर्व रा. वाडेबोल्हाई, हवेली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर भालेराव यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम आणि धोंडिबा यांचे लग्न झाल्यापासून तिचा सासरचे लोक छळ करीत होते. वेळोवेळी घरगुती कारणाने तसेच संशयीवृत्तीने मारहाण करून नीलमला त्रास देत होते. त्यामुळे छळास कंटाळून नीलमने २० मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासू-सासऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.