पुणे: थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

पुणे, ०५/०७/२०२२: हवेली तालुक्यातील थेऊरमध्ये एका तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ( दि. ५) उघडकीस आली. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटलेली नाही.

 

कारखान्याच्या मोकळ्या जागेत मंगळवारी पहाटे स्थानिक नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुभाष काळे व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी गेले. तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.

 

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलीची नेमकी ओळख पटली नाही. डोळ्यात दगड घातल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.