पुणे: महामेट्रोच्या पौड रस्त्यावरील कारशेडनजीक गोळीबारात कामगार जखमी

पुणे, २६/०८/२०२१: शहरातील ‘महामेट्रो’च्या पौड रस्त्यावरील हिल व्ह्यु कारशेडनजीक अज्ञाताने केलेल्या गोळीबारात कर्मचाऱ्याच्या छातीला गोळी चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला आहे. अंजयकुमार श्रीवास्तव (वय.२४,रा. बिहार) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बुधवारी सायंकाळी साडेपाच्या सुमारास येथील मेट्रोच्या कारशेडमध्ये कर्मचारी वेल्डिंगचे काम करत होते. त्यावेळी एका कर्मचाऱ्याजवळ काहीतरी वस्तू पडल्याचा भास झाला. त्याने जवळ जाऊन ती वस्तू उचलून पाहिली असता, बंदुकीची पुंगळी असल्याचे आढळून आले. काही वेळानंतर आणखी तीन ते चार वेळा आवाज झाला. त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या छातीला गोळी चाटून गेली होती. कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा कारशेड उभारण्यात आला आहे. दरम्यान नेमका गोळीबार कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी एसीपी गजानन टोम्पे आणि कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.