September 12, 2025

पुणे: रिक्षामध्ये विसरलेली पर्स शोधून १.०९ लाख रुपये किंमतीच्या वस्तू परत, येरवडा पोलिसांची कामगिरी

पुणे, १९ मे २०२५: दिनांक १९ मे २०२५ रोजी एका महिलेनं रिक्षामध्ये विसरलेली पर्स परत मिळवून देत येरवडा पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता आणि प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे.

सुहासिनी चंद्रकांत धोत्रे (वय ४५ वर्षे, व्यवसाय – नोकरी, रा. सुभाष नगर, येरवडा) या महिला बँकेच्या कामानिमित्त दुपारी १ वाजता येरवडा गाडीतळ येथे रिक्षामधून पोहोचल्या होत्या. बँकेतील काम आटोपल्यानंतर अंदाजे १.३० वाजता त्यांना लक्षात आले की आपली पर्स त्या वापरलेल्या रिक्षामध्येच विसरून गेल्या आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पर्समध्ये सुमारे १.०९ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चेनसह रोख रक्कम होती. तात्काळ त्या येरवडा पोलीस स्टेशनला दाखल झाल्या व त्यांनी सपोनी पाटील, पोउनी सुर्वे, आणि पोलीस अंमलदार कांबळे यांच्याशी संपर्क साधला. महिलेनं रिक्षाचालकाला गुगल पेच्या माध्यमातून पैसे दिले असल्याची माहिती दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी डीबी पथकाच्या मदतीने त्वरेने तपास सुरू केला.

तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित रिक्षा शोधून काढण्यात आली आणि त्यामध्ये आढळलेली पर्स महिलेपर्यंत सुखरूप पोहोचवण्यात आली. पर्समधील सर्व मौल्यवान वस्तू तंतोतंत असल्याचे खात्री करून ती महिलेला परत देण्यात आली.