पुणे: विजेची तार अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

पुणे, १२/०७/२०२२: पुण्यातील दत्तवाडी येथे मुख्य सिंहगड रस्त्यावर असलेल्या सवाई हॉटेल जवळ हाय टेन्शनची वायर मंगळवारी खाली रस्त्यावर पडली.या घटनेत एका मुलाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रोहित संपत थोरात (वय. 20) असे त्याचे नाव आहे. तो भाजी विक्रेता म्हणून काम करत होता.मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास तो पायी जात असताना ही घटना घडली आहे.

 

याबाबत महावितरणने सांगितले आहे की, सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे मंगळवारी सकाळी विद्युत अपघातामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या पर्वती विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये उपरी लघुदाब वाहिनीची तीन फेजपैकी एक वीजतार तुटून खाली पदपथावर लोंबकळत असल्याचे आढळून आले. ही वीजतार तुटल्याक्षणीच फ्यूज गेला व तारेतील विद्युत प्रवाह देखील तात्काळ बंद झाला. मात्र वीजप्रवाह नसलेली ही तार अनधिकृत व्यक्तीने हटविण्याच्या किंवा ओढण्याच्या प्रयत्नामध्ये उर्वरित दोन फेजच्या तारांमधील वीज लोंबळकणाऱ्या तारेत प्रवाहीत झाली व त्याचा धक्का बसून दुर्दैवी प्राणांतिक अपघात झाला अशी शक्यता आहे.

 

या अपघातप्रकरणी महावितरणकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाला कळविण्यात आले. संबंधित विद्युत निरीक्षकांनी अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करून चौकशीला सुरवात केली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबियास तातडीची २० हजार रुपयांची प्राथमिक आर्थिक मदत महावितरणकडून देण्यात येत आहे.