पुणे: भररस्त्यात गोळ्या झाडून तरुणाचा खून, दुर्गामाती मंदिराजवळील घटना

चंदननगर, २१/०८/२०२२: भल्या सकाळी एका कचरा वेचक तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या हत्येचे कारण अस्पष्ट असून, हल्लेखोर पसार झाले आहेत. दुचाकीवरील दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडत त्याची हत्या केली.

 

अक्षय प्रकाश भिसे (वय २५, रा. पठारे वस्ती) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत अक्षयच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे.

 

अक्षय हा कचरा वेचक होता. तो दररोज सकाळी कचरा गोळा करण्यास जात असत. रविवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास तो घरातून कचरा गोळा करण्यासाठी निघाला होता. पायी चालत तो दुर्गामाता मंदिराच्या पाठिमागील एकनाथ पठारे वस्तीतून जात होता. त्यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी येथील गल्लीत अक्षयला गाठले. तसेच, त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. भल्या सकाळीच गोळीबार झाल्याने एकच गोंधळ उडाला. गोळ्या लागल्याने अक्षय रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. लागलीच नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.