पुणे: कोंढव्यात टोळक्‍याकडून कोयत्याने वार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु, तिघाना अटक

पुणे, १३/०८/२०२१: जुन्या वादातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केलेल्या तरुणाचा गुरुवारी रात्री अकरा वाजता ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडुन तिघाना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक जाधव (वय 22, रा. कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल दाखल आहे.

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव कोंढव्यातील रहिवासी असून त्याच्यावर यापुर्वीच एका व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याची यापुर्वी काही तरुणांशी भांडणे झाली होती. दरम्यान, कार्तिक हा गुरूवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात आला होता. त्यावेळी टोळक्‍याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने उपचाराठी त्यास तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी प्रारंभी खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये आता खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे