पुणे: फॉरेस्ट पार्क लोहेगाव येथे झोमाटो डिलिव्हरीच्या व्यक्तीला दरोडेखोरांनी लुटले 

पुणे, ६/७ /२०२१- झोमॉटो कंपनीच्या डिलीव्हरी बॉयला भररस्त्यात तिघांनी अडवून चाकूने वार करत लुटल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लोहगाव परिसरातील फॉरेस्ट पार्क येथे घडली. याप्रकरणी कमलेश पांडे (वय ३२, रा. वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव) यांनी  विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पांडे हे झेमॉटो कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतात. शनिवारी रात्री त्यांना लोहगावच्या एअरपोर्ट परिसरात  ऑर्डर आली होती.  संबंधित ऑर्डर देण्यासाठी साडेअकराच्या सुमारास गेले होते. ऑर्डर देऊन ते फॉरेस्ट पार्क रस्त्याने येत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी एअर फोर्सच्या भिंतीजवळ त्यांना अडविले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळी पैसे काढून देण्यास सांगितले. पण, त्यांनी   प्रतिकार करताच चोरट्यांनी त्यांच्या मानेवर चाकूने वार करून  जखमी केले. त्याच्याजवळील दुचाकी जबरदस्तीने घेऊन नगर रोडच्या दिशेने पळून गेले. 


याप्रकरणी डिलीव्हरीबॉयने पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढत आहेत.