पुण्यात तयारीतूनच दिसत आहे बाप्पाच्या येण्याची आतुरता!

शितल विजापूरे 

 

पुणे , दि.२८/०८/२२ : पुण्यात सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. एकीकडे मुर्तीकार त्यांच्या कलाकृतींवरून शेवटचा हात फिरवत आहेत तर दुसरीकडे सार्वजनिक गणेश मंडळे मोठ्या प्रमाणावर कामगार लावून मंडप बनवण्याची तयारी करत आहेत.

 

शहरातील दगडुशेठ, कसबा पेठ, सदाशिव पेठ याठिकाणी गणेशाच्या आगमनासाठी भक्तांनी जोरात तयारी सुरू केली आहे. सगळीकडे मंडप बांधण्याचं काम सुरु आहे. मंडपापासून काही अंतरावर कमानी बनवल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या थीमनुसार मंडपे तयार करण्यात येत आहेत.

 

पुण्याचे ग्रामदैवत आणि पहिला मानाचा गणपती असलेल्या कसबा पेठेतही गणरायांचे स्वागत करण्यासाठी सगळे भाविक सज्ज झाले आहेत. यावर्षी कसबा पेठेतील गणपतीसाठी फुलांचा मंडप बनवण्यात येत आहे, त्याचप्रमाणे बाप्पाची मिरवणूक पालखीमध्ये काढली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शेखर यांनी दिली.

 

त्याचप्रमाणे तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग गणपती, श्री केसरीवाडा गणपती या मानाच्या गणपती मंडळांनीही गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे.

 

सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा तर होतोच, पण सर्व भाविकांच्या घरीसुद्धा गणरायांचे आगमण होते‌. बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भक्तजण मोठ्या आनंदात तयारीला लागले आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. फुलांच्या माळा, देखाव्यासाठी लागणार्या वेगवेगळ्या गोष्टी, सजावटीसाठी लागणार्या वेगवेगळ्या वस्तूच्या दुकांनांनी जसं काय परिसर सजवला आहे.

 

गणेशोत्सवासोबतच गौरींचेही आगमण असल्याने पेठांच्या परीसरात, मंडईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. सार्वजनिक बस मध्ये सुद्धा माणसांची गर्दी उसळून निघाली आहे. बसमध्ये उभं राहण्यासाठीही जागा नाही, अशी स्थिती आहे, तरीही सर्वजण मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.