पुणे, 16 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत गुण तालिकेत अग्रस्थानी असलेल्या बंगाल वॉरियर्स संघवार 49-19 असा विक्रमी विजय मिळवताना पुणेरी पलटण संघाने झुंजार पुनरागमन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत काल हरियाणा स्टीलर्स कडून धककदायक पराभव पत्करावा लागलेल्या पुणेरी पलटण संघाने बंगाल वॉरियर्स ला अजिबात संधी न देता 24 पकडींचा विक्रम नोंदवत सनसनाटी विजयाची नोंद केली.
पहिल्याच लढतीत मनिंदर सिंगची पकड केल्यावर पकंज मोहितेने चढाईत दोन गुण मिळवून पुणेरी पलटण संघाला आघाडीवर नेले. परंतु पटना पायरेटस विक्रमी विजय मिळवताना दाखविलेला फॉर्म कायम राखताना मनींदरने सुपर रेड च्या साहाय्याने बंगाल वॉरियर्स संघाला बरोबरी साधून दिली.
टाईम आऊट च्या वेळी 7-6 अशी आघाडी घेताना पुणेरी पलटण संघाने मनींदरची पुन्हा एकदा पकड केली होती. मात्र, मनींदरने दुसऱ्यांदा सुपर रेड करताना अबीनेश मोहंमद रेझा चियाने आणि पंकज मोहिते यांना बाद करीत वॉरियर्सचे आव्हान कायम राखले. त्याचवेळी मोहित गोयत आणि अस्लम इनामदार यांनी दोन सलग पकडी केल्यावर पुणेरी पलटण संघाने आपले दडपण वाढवत नेत 12 पकडी व चढाईतील 7 गुण या जोरावर मध्यंतराला 20-12 अशी आघाडी मिळवली.
उत्तरार्धातही बंगालची घसरगुंडी कायम राहिली आणि लवकरच त्यांच्यावर लोन चढवून पुणेरी पलटण संघाने आपले वर्चस्व कायम राखले. गेल्या लढतीत 15 गुण मिळवणाऱ्या मनींदरला निष्प्रभ ठरवीत पुणेरी पलटण संघाने बंगालच्या प्रत्येक चालीला चोख उत्तर दिले. चतुरस्त्र कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने लवकरच बंगाल वर दुसरा लोन चढविला व अखेरीस 49-19 अशा विजयाची नोंद केली.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय