विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेत तमिळ थलाईवाजकडून पुणेरी पलटण संघाला पराभवाचा धक्का

पुणे, 6 नोव्हेंबर 2022: मशाल स्पोर्टस् यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत उत्कंठा पूर्ण लढतीत तमिळ थलाईवाज संघाने साखळी गटातील अव्वल स्थानावर असलेल्या पुणेरी पलटणला ३५-३४ असे पराभुत करत आश्चर्यजनक विजयाची नोंद केली. पूर्वार्धात तमिळ संघाकडे असलेली एक गुणाची आघाडीच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत अग्रस्थानावर असलेल्या पुणेरी पलटण संघाला तमिळ थलाईवाज संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून चिवट लढत दिली. त्यामुळे आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांमध्ये विलक्षण चुरस दिसून आली. मध्यंतराला तमिळ संघाने १६-१५ अशी निसटती आघाडी घेतली होती. 

उत्तरार्धात सुरुवातीलाच तमिळ संघाने पहिला लोण चढविला आणि आपली आघाडी वाढविली. त्याचे श्रेय नरेंदर कुमार याने एका चढाईत नोंदविलेल्या चार गुणांकडे जाते. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना तमिळ संघाकडे सहा गुणांची आघाडी होती.तमिळ संघाच्या खेळाडूंनी सुपर टॅकलमध्येही चांगले कौशल्य दाखविले. पाच मिनिटे बाकी असतानाही त्यांच्याकडे आघाडी होती. तीन मिनिटे बाकी असताना पुण्याच्या खेळाडूंनी लोण परतविला आणि सामन्यात पुन्हा रंगत आणली. मात्र शेवटपर्यंत तमिळ संघाने आपली आघाडी कायम ठेवीत सामना जिंकला.

तमिळ संघाकडून अजिंक्य पवार यानेही खोलवर चढाया केल्या तर सागर कुमार याने उत्कृष्ट पकडी केल्या. पुणे संघाकडून अस्लम इनामदार याला सूर गवसला त्याच्याबरोबरच मोहित गोयत यानेही जोरदार चढाया केल्या तसेच सुरेख पकडी केल्या.