September 24, 2025

पटना पायरेटसचा धुव्वा उडवून पुणेरी पलटण संघाचा विजयाचा षटकार

चेन्नई, 26 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत 42व्या सामन्यात तीन वेळच्या विजेत्या पटना पायरेटस संघाचा 46-28 असा 18गुणांच्या फरकाने धुव्वा उडवताना पुणेरी पलटण संघाने मोसमातील सहाव्या विजयाची नोंद केली. पंकज मोहितेने सुपर 10 कामगिरी सह अकरा गुण, तर मोहित गोयलने 9गुण मिळवताना विजयात मोलाचा वाटा उचलला. 

चेन्नई येथील एसडीएलटीए इंडोर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने 7सामन्यातील 6विजयासह 31गुण मिळवून गुण तालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. तर, पटना पायरेटस संघाचा 7सामन्यातील हा चौथा पराभव ठरला.

पहिल्या काही मिनिटांतच पुणेरी पलटण संघाला 6-1 अशी आघाडी घेतली होती.मात्र सचिनची सुपर टॅकल आणि मनजीतच्या चढाईमुळे पटना पायरेटस संघाने ही आघाडी 6-5 अशी कमी केली. दरम्यान पंकज ने केलेल्या अफलातून चढाई मुळे पटनाचे पाच गडी बाद झाले आणि पुणेरी पलटण संघाने पहिला लोन चढवून 14-8 अशी दहाव्या मिनिटाला आघाडी घेतली.दोन्ही संघांनी संघर्षपूर्ण खेळ केल्यावरही मध्यंतराला पुणेरी पलटण संघाकडे 22-15 अशी आघाडी राहिली. 

उत्तरार्धात मात्र, पुणेरी पलटण संघाने सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवले. इराणचा अष्टपैलू खेळाडू मोहंमद रेझा शादलू याने सुपर रेड सह दोन चढायात 4 गुण मिळवून पटना पायरेटस वर एकहाती दुसरा लोन चढविला. यावेळी पुणेरी पलटण संघाकडे 38-22 अशी आघाडी होती. 

त्यांनतर पुणेरी पलटण संघाच्या प्रत्येक खेळाडूने किमान सात गुणांची नोंद करताना पटना पायरेटस वर दडपण ठेवले. मोहित गोयलने 9, तर कर्णधार अस्लम इनामदार लने 6 गुण मिळवले. हाच धडाका कायम ठेवताना सहा विजय मिळवणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला.