September 11, 2025

पुण्याच्या यजुर्वेंद्र महाजन यांची ‘गेल’चे संचालक म्हणून नियुक्ती

पुणे, दि. १७ जून, २०२५ : देशातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आदिवासी व ग्रामीण तरुणांच्या निवासी उच्च शिक्षणासाठी दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल उपक्रमाच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन यांची केंद्र सरकारने गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (जीएआयएल) अर्थात ‘गेल’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे नॉन ऑफिशियल संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. दीपस्तंभ फाउंडेशनचे राष्ट्रीय स्तरावरील भरीव योगदान लक्षात घेत केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ दि कॅबिनेट (एसीसी) यांनी नुकतीच सदर नियुक्ती जाहीर केली असून पुढील तीन वर्ष यजुर्वेंद्र महाजन हे जीएआयएलचे स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहणार आहेत.

याबरोबरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनचे सल्लागार म्हणून येत्या काळात महाजन काम पाहतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनचे सल्लागार म्हणून केलेली नियुक्ती ही महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने करण्यात आली आहे हे विशेष.

महाराष्ट्र व्हिजन २०४७ तयार करण्यासाठीच्या दिव्यांग कल्याण समितीवर देखील यजुर्वेंद्र महाजन यांची नियुक्ती झाली आहे. विकसित भारत २०४७ या भारत सरकारच्या उपक्रमाच्या अनुषंगाने राज्याचा २०४७ पर्यंतचा व्यापक दृष्टीकोन आणि रणनीती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्र २०४७ बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत नुकतीच नरिमन पॉइंट, मुंबई येथील दिव्यांग कल्याण विभागात आयोजित बैठकीमध्ये ही नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्त्यांनंतर समाजातील दिव्यांग, विकलांग, विशेष विद्यार्थी, नागरिक, आर्थिकदृष्ट्या वंचित असलेले नागरिक यांचे प्रश्न सरकार दरबारी प्राधान्याने मांडता येतील आणि त्यांसाठी जास्तीत जास्त काम करता येईल, असा आशावाद दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केला.