पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांचा समावेश

पुणे, दि. 2 डिसेंबर 2022 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांना आमंत्रित करण्यात आले असून स्पर्धेला ५ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे.  या स्पर्धेतील सामने  पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, नेहरू स्टेडियम, बारणे क्रिकेट मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेतील उदघाटनाचा सामना सोमवार दि 5 डिसेंबर 2022  ला पी वाय सी जिमखान्याच्या मैदानावर खेळला जाणार आहे.
  
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की, या स्पर्धेत आयोजक पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना,  पुना क्लब, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, केडन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र, युनायटेड स्पोर्ट्स क्लब,  पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी, अँबिशियस क्रिकेट क्लब, स्टार्स क्रिकेट क्लब हे  10 संघ झुंजणार आहेत. 
 
फिल्ट्रमचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर यांनी सांगितले की, या स्पर्धेला प्रायोजित करून आम्हांला आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता व कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.   
 
 क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड पुढे म्हणाले की, स्पर्धेतील १० संघांना ५ संघांच्या दोन गटांमध्ये  विभागण्यात आले आहे व स्पर्धा लीग पध्दतीने खेळवली जाणार आहे. दोनही गटातील अव्वल संघ हे फायनल ला पात्र ठरतील. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यांतील खेळाडूंना बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) आयोजित २५ वर्षांखालील कर्नल. सी. के. नायुडू स्पर्धेसाठी  सराव व्हावा या अनुषंगाने या स्पर्धेतील सामने दोन दिवसाचे खेळविण्यात येणार आहेत. 
 
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या व उपविजेता संघाला करंडक देण्यात येणार  आहे. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि मालिकावीर यांनादेखील करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा व अंतिम सामना पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. 
 
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विनायक द्रविड, सारंग लागू,  निरंजन गोडबोले, इंद्रजीत कामतेकर, पराग शहाणे, कपिल खरे यांचा सहभाग आहे