September 24, 2025
Punekar News Marathi Logo

पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेस आजपासून प्रारंभ

पुणे, 9 डिसेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.9 ते 16 डिसेंबर 2023 या कालावधीत पीवायसी मैदानावर होणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष श्री कुमार ताम्हाणे, क्लबचे सचिव श्री सारंग लागू आणि पुसाळकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहन पुसाळकर यांनी सांगितले की, स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून संघांचे मालक हे क्लबचे सदस्य आहेत. स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे श्री विजय पुसाळकर हे मुख्य प्रायोजक असून  सलग पाचव्या वर्षी त्यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, होडेक यांचे पण सहप्रायोजक म्हणून सलग सहा वर्ष त्यांचे सहकार्य लाभले आहे. बेलवलकर हाऊसिंग लिमिटेड, चाफळकर करंदीकर डेव्हलपर्स यांचे असोसीएट
स्पॉन्सर लाभले आहे, तर सुप्रीम इन्फ्रा, सुजनील आणि नेव्हीटास जेनसेट यांचे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेत ए अँड ए शार्क्स, बेलवलकर बॉबकॅट्स, जीएम टायफून्स, कोतवाल बदामीकर युनिकॉर्नस, लाईफसायकल स्नो लेपर्डस, नॉक99 पुणेरी बाप्पा, राहुल वेअर वुल्व्हस, ओव्हनफ्रेश टस्कर्स, पंडित जावडेकर डॉल्फिन्स, रावेतकर बुल्स, रॉयल स्टॅलियन्स, सैनुमेरो चिताज, स्नो लेपर्डस, स्वोजस टायगर्स, ट्रूस्पेस जॅगवॉर्स, साठे-बोथरा जॅगवार्स हे 16 संघ सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले
स्पर्धेबद्दल अधिक माहिती देताना क्रिकेट विभागाचे सचिव श्री. विनायक द्रविड म्हणाले की स्पर्धेतील 16 संघांची 3 गटात विभागणी करण्यात आली आहे.दोन गटात प्रत्येकी 5 संघ आणि तिसऱ्या गटात 6 संघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि आणखी दोन संघ गुणसरासरी आणि नेटरनरेटच्या आधारावर उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. 16 डिसेंबर 2023 या दिवशी होणार आहे.स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विनायक द्रविड, अभिषेक ताम्हाणे, निरंजन गोडबोले, शिरीष आपटे, विकास आचलकर, सिद्धार्थ दाते, नंदन डोंगरे व कपिल खरे यांचा समावेश आहे. महेंद्र गोखले हे स्पर्धा संचालक, तर चारुदत्त कुलकर्णी हे स्पर्धेचे मुख्य रेफ्री म्हणून काम पाहतील.