आर. के. लक्ष्मण महाराष्ट्राचे वैभव-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, 14 नोव्हेंबर 2022: आर. के. लक्ष्मण हे राजकारणावर व्यंगचित्र काढणारे देशतील श्रेष्ठ व्यंगचित्रकार होते, ते खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्राचे वैभव’ आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

बालेवाडी येथील आर. के. लक्ष्मण संग्रहालयाला भेटीप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आर. के. लक्ष्मण यांचे सुपुत्र श्रीनिवास लक्ष्मण, स्नुषा उषा लक्ष्मण आदी उपस्थित होते.

आर. के. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र हे त्यांचे एक विश्व होते त्याचा आत्मा होता, असे म्हणत श्री.केसरकर म्हणाले, त्यांनी सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाला व्यंगचित्राच्या माध्यमातून सोप्यारीतीने मांडण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी व्यवसायिक, पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यंगचित्रासारख्या कलेचे शिक्षण देण्याची गरज आहे. पालकांनी मुलाच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिले पाहिजे.या कलेचा राज्यात प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर. के. लक्ष्मण संग्रहालयाच्या माध्यमातून आगामी काळात उत्तम व्यंगचित्रकार निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी केली. यासाठी शासन स्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बाल दिनानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.