पुणे मेट्रो करणार रेन वॉटर हार्वेस्टिंग अन दुभाजकांचे सुशोभिकरण

पुणे, २७ डिसेंबर २०२२: वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड यादरम्यान एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन व मार्गावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन महामंडळाने सुरू केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेद्वारे हे पाणी मेट्रो खालील दुपारकांमध्ये आणून तेथे सुशोभीकरण केले जाणार आहे. यामुळे पाण्याची बचत ही होईल आणि शहराच्या सुंदरतेमध्ये देखील भर पडणार आहे. खास या कामासाठी निविदा काढली असून पुढील पाच वर्षे संबंधित ठेकेदार हे काम पाहिले व त्यास जाहिरात फलक लावण्याची परवानगी महामंडळाने दिल्याने उत्पन्नाचे साधन ठेकेदारास मिळणार आहे.

मेट्रोने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे. मेट्रो मार्गिकेतील झाडांचे पुर्नरोपण, नवीन झाडांची लागवड, मेट्रो स्थानकांच्या छतावर सोलर पॅनल बसविणे, पाण्याचा पुर्नवापर करण्याचे सयंत्र, बायोडाईजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग पुणे मेट्रोची सर्व इमारतींचे ‘आयजीबीएस’ प्लॅटिनम रेटिंग गुणवत्तानुसार बांधकाम (जेणेकरून ऊर्जेची बचत होईल) व रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे लावणे ही कामे केली जातील.
मेट्रोच्या २ खांबामधील अंतर साधारणतः २५ ते ३० मीटर असून त्याची रुंदी २ ते २.२५ मीटर आहे. पुणे मेट्रोच्या व्हायडक्तची रुंदी ८ मीटर असून लांबी २५ किमी आहे. एवढ्या मोठ्या पृष्ठभागावर पडणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे जमिनीत गेले तर मोठ्या प्रमाणावर भूमिगत जल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यासाठी पुणे मेट्रोने व्हायडक्तच्या दोन खांबांमध्ये (एक सोडून एक) रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी उपाययोजना केली आहे. पावसाचे पाणी डाऊन टेक पाईप द्वारे सेटलींग चेंबर मध्ये आणून तेथून फिटर व बोरे वेल द्वारे जमिनीत सोडले आहे. पुणे महानगरापलिकेने जागोजागी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झुडूप लावून त्यांचे सुशोभीकरण केले आहे. त्याच धर्तीवर रस्ते दुभाजकांमध्ये चांगली माती टाकून झाडे लावून त्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे सुशोभीकरणाचे काम करताना मेट्रोवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये म्हणून वाहतूक बेटांच्या (ट्राफिक आयलँड) धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोने निविदा काढल्या होत्या. वनाझ स्थानक ते गरवारे स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि सिव्हिल कोर्ट स्थानक ते रामवाडी स्थानक येथील निविदा मान्य करून त्याचा कार्यादेश एका कंपनीला देण्यात आला आहे.

दुभाजकांच्या सुशोभीकरणाबरोबरच तेथे २ जाहिरात फलक लावण्याची मुभा त्या कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. याव्यतिरिक्त त्या कंपनीला शहराच्या महत्वाच्या ठिकाणी चौकांमध्ये मेट्रो खांबावर व्हर्टिकल गार्डन करण्यास सांगण्यात आले आहे. दुभाजकांमधील झाडे, लॉन व व्हर्टिकल गार्डन याची देखभाल कंपनीला ५ वर्षेपर्यंत करावयाची आहे. अश्या प्रकारच्या नियोजनामुळे दुभाजक/रस्ता सुशोभीकरणाबरोबरच मेट्रोला नॉन फेअर बॉक्स उत्पन्नदेखील मिळणार आहे.

पुणे मेट्रोचे पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. यात २५ किमी उन्नत मार्ग असून हा मार्ग रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकांमध्ये उभारण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंग हिल स्थानक आणि रामवाडी स्थानक हे मार्ग उन्नत असून ते रस्त्याच्या मधोमध खांब उभारून बांधण्यात आले आहेत. मेट्रोची कामे सुरु असल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे व दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते. नुकतेच मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्यामुळे हि दोन्ही कामे मेट्रोने हाती घेतले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली.

“पुणे मेट्रो पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बांधील आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत आणि पुण्याचा बराचसा भाग दाट झाडीने व्यापला आहे. त्याला सुसंगत म्हणून मेट्रोने रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सुशोभीकरणाचे कार्य हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सुशोभीकरणात भरच पडणार आहे.” डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक