September 12, 2025

ससून रुग्णालयातील वेटिंग हॉलमध्ये पावसाचं पाणी; रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास

पुणे, २८ मे २०२५: येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्‍या ब्लॉक नंबर १३ मधील वेटिंग हॉलमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने तेथे उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. छतावरील पत्र्यावरून वाहून येणारं पाणी थेट वेटिंग हॉलमध्ये साचत असल्यामुळे बैठकीसाठी असलेली जागा पाण्याने भरली आहे.

या परिस्थितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसापासून संरक्षण नसल्यामुळे अनेकांना उभे राहावे लागत असून, वृद्ध आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

एक नातेवाईक म्हणाले, “आम्ही रुग्णांची सेवा करण्यासाठी इथे बसतो, पण पावसाचं पाणी हॉलमध्ये येतं आणि सगळं भिजतं. ही समस्या वर्षानुवर्षं आहे, पण काही उपाय होत नाही.”

नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेटिंग हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही, यासाठी जलनिस्सारण आणि छतावरील गटार व्यवस्था दुरुस्त करणं गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

रुग्णालय प्रशासनाने अद्याप यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अशा समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक बनले आहे.