पुणे, २७ जून २०२५: पुणे स्टेशनच्या नामांतरासंदर्भात केलेल्या विधानावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून पोस्टरबाजी झाल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकारामुळे त्यांना वैयक्तिक पातळीवर त्रास झाला असून, पोस्टर लावणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी.
पुणे स्टेशनचे नामांतर “श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे” यांच्या नावावर करावे, अशी मागणी खासदार कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून बुधवार पेठेला “बाजीराव मस्तानी पेठ” असे नाव देण्याची मागणी करत एक पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरमध्ये खासदार कुलकर्णी यांचा फोटो वेगळ्या पोशाखात वापरण्यात आल्यामुळे त्या संतप्त झाल्या.
आज पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मी फक्त माझं मत मांडलं की, पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं, कारण त्यांनी मराठा साम्राज्य विस्तारासाठी योगदान दिलं. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग मला ते का नाकारलं जातं?”
कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, “राजघराण्यातील मस्तानीबाई यांचं नाव वेश्यावस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराला देण्याची मागणी करणे हे अनुचित आहे. मस्तानी पेशव्यांची पत्नी होत्या. अशा प्रकारचं पोस्टर लावणं म्हणजे महिलांना राजकारणात दबावाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. गेली तीस वर्षे मी राजकारणात सक्रिय आहे, आणि मला अशा प्रकारे लक्ष्य करणं दुर्दैवी आहे.”
आपल्या भावना व्यक्त करताना खासदार कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले. “माझ्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणाऱ्या या प्रकारावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
More Stories
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ