December 2, 2025

पुण्यात संविधान दिनानिमित्त शांतता व गुन्हेगारीमुक्तीच्या संदेशासाठी रॅली

पुणे: २७ नोव्हेंबर २०२५: संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रो पुण्यात शांतता आणि गुन्हेगारीमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने युवासाथी सामाजिक मंच यांच्या विद्यमाने रॅली काढण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरापासून सुरुवात झालेली ही रॅली कलाकार कट्ट्यापर्यंत जात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महेश देशमुख, अल्ताफ शेख, सुजीत गायकवाड, राजवैभव रामचंद्र यांसह विद्यार्थी, नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संविधानाबद्दल जागृती निर्माण करणे आणि समाजाने संविधानाकडे केवळ पुस्तक म्हणून नव्हे तर दैनंदिन जीवनाचा आधार म्हणून पाहावे, हा या रॅलीचा मुख्य हेतू होता. सहभागी नागरिकांनी संविधानाची प्रत व भारतीय ध्वज हातात घेतला होता. “शिक्षण, नोकरी, हक्‍कांची कास धरा; गुन्हेगारीला बास करा” तसेच “सरकारने थांबवावी बेरोजगारी; तरच थांबेल गुन्हेगारी” अशा संदेशपूर्ण घोषणा आणि पाट्यांनी वातावरण भारून गेले.

बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ती आळा घालण्यासाठी संविधानाचा वापर दैनंदिन जीवनात व्हायला हवा, असे मत ॲड. नाथा देशमुख यांनी व्यक्त केले. “अधिकारांवर गदा आली की आपण संविधानाची आठवण करतो, परंतु तेच अधिकार प्रत्यक्ष जीवनात का वापरत नाही? संविधानाचे सामर्थ्य कृतीतून दाखवा,” असे आवाहन त्यांनी केले.

कलाकार कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी मनोगत व्यक्त करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान टिकवणे आणि त्याची जपणूक करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.