‘महाविकास आघाडी गो’ असा नारा देत रामदास आठवलेंनी साधला विरोधकांवर निशाणा

पुणे, 27/12/2021: “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला जास्त गर्दी होऊ नये, अशी अधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. त्याला प्रतिसाद देत मीही कार्यकर्त्यांना एक जानेवारीला भीमा कोरेगावला दर्शनासाठी गर्दी करू नये. कोरोनाबाबतीत नियमांचे पालन करून अनुयायांनी दर्शनासाठी यावे,” असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ‘गो महाविकास आघाडी गो’ असा नारा देत आठवले यांनी राज्य सरकारवर टीका केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत उपमहापौर सुनीता वाडेकर, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, ऍड. मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, मोहन जगताप श्याम सदाफुले, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “भीमा कोरेगाव स्तंभाजवळील २० हेक्टर जमीन शासनाने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी. त्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे. पुरातत्व खाते, पर्यटन खात्याच्या वतीने तेथे स्मारक उभे राहावे. अनुयायांना केवळ एक जानेवारीलाच नव्हे, तर कायम येता येईल, दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था उभारावी. ग्रंथालय, संग्रहालय उभारावे. महार बटालियन आणि पोलिसांनीही विजयस्तंभाला मानवंदना द्यावी.”

‘गो महाविकास आघाडी गो’

आपल्या मिश्किल कवितांसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. ‘गो कोरोना गो’ ही घोषणा जगभर गाजली. आता ओमिक्रोन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा ‘गो महाविकास आघाडी गो’ असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये तरतूद करावी.

… तर शिवसेनेचा पाच वर्ष मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृती लवकर सुधारावी. बाळासाहेब असताना शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला होता. ठाकरे चांगले मित्र आहेत. सत्तेत पन्नास टक्के वाटा देऊ, असे म्हटले असले, तरी अडीच वर्षे मुख्यमंत्री देण्याबाबत कधीही आश्वासन दिले नव्हते. शिवसेनेने घात केला. पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेला देऊन भाजप शिवसेना एकत्र येण्याचा विचार करावा, असा माझा प्रस्ताव आहे. शिवसेना-भाजप एकत्र येईल का हे पाहावे लागेल. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबत भाजपला विनंती करणार आहे.

पाच राज्यांत यश मिळेल

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत आहे. या राज्यात रिपाइंला मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे भाजपाला फायदा होईल. भाजपने रिपाइंला प्रत्येक राज्यात काही जागा द्याव्यात. जागा देणे शक्य नसेल, तर सत्तेत वाटा मिळावा, अशी चर्चा करणार आहे. अखिलेश यादव यांचा प्रयत्न सुरु असला, तरी सत्ता मिळणे अवघड आहे. तेथील गुंडशाही संपुष्टात आणून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचा भाव कमी केला आहे. कृषी कायदे मागे घेतले आहेत. पुन्हा सरकार कायदे आणणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. पाचही राज्यात भाजपची सत्ता येईल.

राज्यपालांच्या अधिकारांत ढवळाढवळ नको

राज्यपाल सक्रिय आहेत. त्यांचा अधिकाराचा चांगला वापर करत आहेत. गैरवापर करतात असे म्हणणे चुकीचे. याउलट राज्य सरकारकडून राज्यपालांच्या अधिकारात ढवळाढवळ सुरु आहे. ती थांबायला हवी.  राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली असली, तरी हे सरकार घालवणे गरजेचे आहे.

पालिका निवडणुकीत भाजपसोबत

आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत राहील. सध्या पुणे महापालिकेत ररिपाइंचे पाच नगरसेवक आहेत. मागच्या वेळी १३ जागा दिल्या होत्या. यावेळी १५-१६ जागा द्याव्यात. आरक्षण पडले, तर महापौर पद द्यावे. मुंबईतही भाजप-रिपाइं एकत्रित येऊन उपमहापौर पद रिपाइंला मिळेल. अन्य महानगरपालिका व जिल्हा परिषद यामध्येही आम्ही भाजपसोबत आहोत आणि सत्ता मिळवू.

गांधींबाबतचे वक्तव्य चुकीचे
महात्मा गांधींच्या विचारांवर नरेंद्र मोदी सरकार काम करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या बाबतीत साधू-संतांनी अशी टीका-टिपण्णी करणे योग्य नाही. या वक्तव्याबाबत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा.

यावेळी दलित पँथर चळवळीतील यशवंत नडगम यांनी कार्यकर्त्यांसमवेत रिपाइंमध्ये प्रवेश केला. शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.