रेप क्रायसिस सेंटर करणार महाराष्ट्रातील बलात्कारर्ग्रस्ताना कायदेविषयक मदत  

पुणे, ३१ऑगस्ट २०२१: बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि बलात्काराच्या केसेस मधील साक्षीदारांना कायदेविषयक मदत व सहाय्य्य देण्यासाठी सहयोग ट्रस्ट तर्फे  ‘रेप क्रायसिस सेंटर ‘ सुरु करण्यात आल्याचे ॲड.रमा सरोदे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत सुरेखा दास , रेश्मा गोखले, गौरांगी ताजने, ॲड.अजित देशपांडे, ॲड.अक्षय देसाई, शार्दूल सहारे, तृणाल टोणपे हजर होते.

प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्ह्यांना केवळ प्रतिबंधच होणार नाही तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी परिणामकारक मदत होऊ शकते असेही ॲड.रमा सरोदे म्हणाल्या.

बलात्कारासह जगणार्यांना त्यांचे दुख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून विशिष्ट दिवशी आमच्या कार्यालयात ‘सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे. ज्या महिलांवर लैंगिक आक्रमण झालेले असते त्यांनी जणू काही स्वतःच चूक केली आहे असा दबाव घेऊन त्या जगात असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न ‘सपोर्ट ग्रुप’ करेल. यातूनच बलात्काराच्या केसेस भीतीचे दडपण न बाळगता लढण्याची हिम्मत या स्त्रियांमध्ये निर्माण होईल आणि त्या सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील.

‘मायग्रोथ झोन’ कंपनी न्युरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बालात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक दृष्ट्या ताकदवान करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे. ‘मायग्रोथ झोन’ सोबत सहयोग ट्रस्ट सहकाऱ्याच्या भावनेतून बालात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे अशी स्वतःलाच दोष देणारी भावना , मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी सुधा काम करणार आहे. ‘मायग्रोथ झोन’ ची प्रशिक्षित व अनुभवी टीम या सामाजिक उपक्रामात आम्हाला मदत करणार असल्याचे सुद्धा रमा सरोदे म्हणाल्या.

लॉ इंटर्न गौरांगी ताजने हिने भारतातील व राज्यातील बलात्काराच्या आकडेवारीची माहिती देताना सांगितले कि, २०१९ मध्ये भारतात ३२५५९ बलात्काराच्या घटना झाल्या. म्हणजे, दररोज ८८ बलात्कार झाल्याची माहिती NCRB च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, तर महाराष्ट्रात २०१९ मध्ये २२९९ केसेस नोंद झालेल्या आहेत.

ॲड.सुरेखा दास म्हणाल्या कि , एकीकडे बलात्काराचे प्रमाण कमी होत नसताना दुसरीकडे शिक्षा होण्याचे प्रमाणही नगण्य असल्याने बलात्काराशी लढणाऱ्या  स्त्रियांना नैराश्य येते.

बलात्कार झाल्यावर त्या बद्दल सांगणे सुद्धा मुलींना कठीण वाटते कारण भारतीय समाजात लैंगिक गुन्ह्यांचा संबंध थेट अब्रूशी जोडला जातो. त्यामुळे रेप क्रायसिस सेंटर द्वारे आम्ही अशा स्त्रियांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देणे, त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करणे अशा प्रक्रिया राबविणार असल्याची माहिती रेशमा गोखले यांनी दिली.  

न्यायालयात ज्या महिलांच्या बलात्काराशी संबंधित केसेस सुरु आहेत अशा महिलांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे, प्रश्नांची उत्तरे देण्याबाबतची मानसिक भीती दूर करणे व आवश्यकतेनुसार त्यांच्या केसेस मध्ये सरकारी वकिलांना मदत करण्याची भूमिका पार पाडणे अशी कामे सुद्धा करणार असल्याचे ॲड.अजित देशपांडे व ॲड.अक्षय देसाई यांनी सांगितले. तसेच पुण्याबाहेर राहणाऱ्या महिलांना दूरध्वनीद्वारे देखील सहाय्य व मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बलात्कारग्रस्त स्त्रिया, त्यांची मुले व परिवार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम तृणाल टोणपे करणार आहेत.
बलात्कारग्रस्तांना न्याय मिळवून देणारे विविध न्यायनिवाडे,नोटिफिकेशन्स मदतरूप ठरतील यासाठीचा संशोधनविभाग शार्दूल सहारे, सुषमा सावसाकडे व अभिजीत पाटील हे सांभाळणार आहेत.

महाराष्ट्रातील बालात्कारग्रस्त स्त्रिया आणि त्यांचे नातेवाईक सहयोग ट्रस्ट च्या ०२०-२५४५९७७७ या क्रमांकावर संपर्क साधू शकतील.