‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ पुस्तकांचे रविवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, ०१/१२/२०२२: महाराष्ट्रातील ‘नेक्स्टजेन’ उद्योजकांच्या वाटचालीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि स्वप्नांचा वेध घेणार्‍या ‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ या मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या 2 पुस्तकांचे प्रकाशन रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी मुंबईत राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होत आहे.

मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक श्री. दत्ता जोशी यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून 25 निवडक उद्योजक घराण्यांचा वेध या पुस्तकांतून घेतला आहे. उल्लेखनीय बाब ही आहे, की श्री. दत्ता जोशी यांचे हे 40 वे पुस्तक आहे. ‘द कॅटालिस्ट’ या प्रकाशन संस्थेद्वारे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत.

‘मालकाचा मुलगा’ ते ‘मालक’ या प्रवासात जनरेशन गॅप, कम्युनिकेशन गॅप, इंट्रापर्सनल रिलेशनशिप्समधील वेगवेगळे पैलू समाविष्ट असतात. या प्रत्येक आघाडीवर ही पिढी कशा पद्धतीने समन्वय साधते या पैलूवरही यात प्रकाश टाकलेला आहे. फॅमिली बिझनेसमधील ताणतणाव, वर्क कल्चरमधील बदल, ऑटोमेशनचे आव्हान, कामगारांतील बदलती वृत्ती या बरोबरच आर्थिक नियोजन आणि मूल्ये यांवरही यात चर्चा केली आहे.

महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून दुसर्‍या वा तिसर्‍या पिढीतील उद्योजकतेचा वेध घेतानाच या पुस्तकात महाराष्ट्राबाहेर सूरत येथे कार्यरत असलेल्या आगळ्या उद्योगाचीही पुढच्या पिढीची गाथा उलगडली गेली आहे.

मराठी व इंग्रजीतून एकाच वेळी प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकांत अथांग व अभेद्य जैन (जैन इरिगेशन, जळगाव), अमित घैसास (यशप्रभा ग्रुप, पुणे), निखिल व अभिजित राऊत (अभिजित ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, नायगाव, वसई), परीक्षित प्रभुदेसाई (पितांबरी उद्योगसमूह, ठाणे), मिहीर वैद्य ( श्री गणेश प्रेस अँड कोट्स, औरंगाबाद), स्वराली सावे (एनिकार फार्मास्युटिकल्स, बोईसर), कौस्तुभ फडतरे (कवित्सु रोबोट्रॉनिक्स, सातारा), अंकित काळे (काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, औरंगाबाद), कुशल ठक्कर (महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स, लातूर), रवी जैन (रवी मसाले, औरंगाबाद), अनुप व अतुल कोगटा (दाल परिवार, जळगाव), अनिकेत व निमिष पाटील (वेगा केमिकल्स, जळगाव), श्रुती अहिरे (आनंद अ‍ॅग्रो, नाशिक), अनुराग मोराणकर (एलमेक इंजिनियर्स, धुळे), अभिजित गव्हाणे (मेधावी सिमेंट प्रॉडक्ट्स, नांदेड), चेतन व दीपक पाटील (कृष्णा पेक्टिन्स, जळगाव), मल्हार मुतालिक (पॉझिटीव्ह मिटरिंग पंप्स, नाशिक), सिद्धार्थ कुलकर्णी (हरमन चहावाला, सांगली), क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे (वैदिक संस्कार आर्किटेक्ट्रॉनिक्स, मुंबई), आदित्य कुलकर्णी (निर्मिती ग्रुप, नाशिक), केतकी कोकीळ (संजय ग्रुप, औरंगाबाद), मयांक व वेदांती शर्मा (मयांक अ‍ॅक्वाकल्चर, सूरत), पियुष देसले (पियुष लाईफस्पेसेस, धुळे), सुमीत धूत व कपिल राठी (तुलसी पेन्ट्स प्रा. लि., नांदेड) आणि सौरभ व गौरव भोगले आणि मिहिर सौंदलगेकर (एआयटीजी ग्रुप, औरंगाबाद) या नेक्स्टजेन उद्यमींचा समावेश आहे.

उल्लेखनीय बाब ही आहे की हे सर्व 25 उद्योग परस्परांपासून भिन्न असून या निमित्ताने 25 वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा गाभा समजून घेण्याची संधी या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे. सप्तरंगी छपाई असलेले २३२ पृष्ठांचे क्राऊन आकाराचे प्रत्येकी 500 रुपये मूल्याचे हे पुस्तक ‘फ्लिपकार्ट’वर खरेदीसाठी वाचकांना सवलतीत उपलब्ध आहे.