रेमडीसिव्हिर इंजेक्शनची ४५ हजारांना विक्री, एकाला अटक

पुणे, दि. १९मे २०२१:   रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा साठा करून काळ्या बाजारात ४५ हजारांना विक्री केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. देवेंद्र काळुराम चौधरी (वय २५, रा. लोहगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी औषध निरीक्षक महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरूणाचे वडिल आजारी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला रेमडीसिव्हिर इंजेक्शन आणण्यास सांगितले होते. त्यानुसार संबंधित तरूणाने आरोपी देवेंद्र यांच्याकडे संपर्वâ साधून इंजेक्शनची मागणी केली. त्यानुसार देवेंद्रने साथीदाराच्या मदतीने एका रेमडीसिव्हिर इंजेक्शनची तब्बल ४५ हजारांना विक्री केली. छापील किमतीपेक्षा जादा दराने इंजेक्शनची विक्री करून रूग्णासह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे तपास करीत आहेत.