पुणे: शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी नियोजन करा, बाहेरच्या लोकांचे अतिक्रमण वाढतय:गणेश बिडकर

पुणे, ६/०८/२०२१: शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर अतिक्रमणे होत असून याचा त्रास वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिक्रमणे होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी शुक्रवारी केल्या.

शहरातील विविध रस्त्यांवर होत असलेली अतिक्रमणे आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याबाबत माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी सभागृहनेते बिडकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी अतिक्रमणे होऊ नये याबाबतच्या सूचना केल्या. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त माधव जगताप, परिमंडळ एक ते पाच यांचे उपायुक्त, १५ क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर रस्त्यावरच पथारी व्यावसायिक, फेरीवाले विक्रेते आपले स्टॉल लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फूटपाथ वर तसेच रस्त्यावरच दुकाने लावली जात असल्याने पादचारी रस्त्यांवरून ये – जा करतात आणि त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. याकडे सर्वांनीच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विविध प्रकारचे सण तसेच गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर आल्याने पुढील काही दिवसात रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने स्टॉल उभारून अतिक्रमणे करणाऱ्यांची संख्या वाढू शकते. अद्यापही करुणा पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव यापुढील काळात वाढूनही आणि रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे त्यादृष्टीने येणाऱ्या काळात नियोजन करा, अशा सूचना देखील सभागृह नेते बिडकर यांनी यावेळी केल्या.

चौकातील भिकाऱ्यांचा बंदोबस्त करा
शहरातील अनेक चौकांमध्ये भिकाऱ्यांचा देखील त्रास काही वेळा सहन करावा लागत आहे. कारच्या आणि चार चाकी वाहनांच्या काचांवर हाताने मारून हे लोक वाहनचालकांना त्रास देत असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यांच्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी, अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या.