अपहरणकृत बालकाची सुटका, पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. २२/१२/२०२२ – खाउच्या आमिषाने दोन वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करणार्‍या दाम्पत्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज, विविध रिक्षाचालक संघटनांच्या मदतीने अपहणकृत बालकाची सुटका करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. ही घटना १० डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकात घडली होती.

पार्वती भुवन पाटले (वय २२ रा. उरळी कांचन, मुळ  छत्तीसगढ) नातेवाईकांसह धार्मिक कार्यासाठी  पुणे स्टेशन परिसरातून दानापुरला जाण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी  महिलेसह तिच्या साथीदाराने पार्वती यांच्या दोन वर्षीय मुलाला खाउ देण्याचे आमिष दाखवून अपहरण केले. याप्रकरणी  गुन्हयाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग विभागाचे सहायक  पोलीस निरीक्षक मिलींद झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ तपास पथके रवाना करण्यात आली.  अपहरण झालेल्या बालकाला पळवून घेऊन जाणार्‍या अपहरणकर्त्यांच्या हालचालींचा वेध घेण्यात आला.त्यासाठी  पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रस्त्यांवरील  सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी  करण्यात आली.

परिसरातील  ७८ लॉजेस, हॉटेलवर छापे टाकण्यात आले.  २५० हून अधिक  सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे छायाचित्रण तपासण्यात आले. तपासादरम्यान, चिमुरड्याचे अपरहण रिक्षातून केल्याचे उघडकीस झाले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी ४३ रिक्षाचालकांसह विविध संघटनांना तपासाकामी मदतीला बोलावून घेत माहिती काढली. तांत्रिक माहितीनुसार अपहरणकर्ते रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक लोहमार्ग श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले, पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, वरिष्ठ निरीक्षक ईरफान शेख, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आंतरकर,  एपीआय  पालवी काळे, आर.पी.एफ.  निरीक्षक बी. एस. रघुवंशी, एपीआय मिलिंद झोडगे,   हगवणे, सुनिल कदम,  टेके, दांगट,  कांबळे,  चिले,   कुंभार, पवार,   गवळी,  केंद्रे यांनी केली.