बोपखेलकरांना दापोडी आणि विश्रांतवाडीला जाण्यासाठी नदीपात्रातून मिळणार प्रशस्त नवीन रस्ता 

पिंपरी, ११ फेब्रुवारी २०२२: मागील सहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असलेल्या बोपखेलवासीयांना आता नवीन आणखी दोन रस्ते मिळणार आहेत. बोपखेलवरुन मुळा नदीवरील खडकीला जाणा-या पुलाव्यतिरिक्त मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत बोपखेल ते दापोडी आणि बोपखेल ते विश्रांतवाडीला जाण्यासाठी नदी पात्रा लगत नऊ मीटर रस्ता विकसित होणार आहे. त्यामुळे हा रस्ता देखील बोपखेलवासीयांना वापरण्यास मिळणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महासभेची प्रशासकीय मान्यता मिळताच कामाची निविदा काढून काम सुरु केले जाणार असल्याचे उपमहापौर हिरानानी घुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

 

नदी किनारुन छेदून जाणारा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील हा पहिलाच रस्ते प्रकल्प असणार आहे. नऊ मीटर असा प्रशस्त रस्ता असणार आहे. बोपखेलमधील नागरिकांना पर्यायी रस्ता मिळाल्याने वेळ वाचणार आहे. पैशांची, इंधनाची बचत होईल. त्याचबरोबर वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार असल्याने उपमहापौर घुले यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मुळा नदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहते. महापालिका हद्दीत नदीची वाकड ते बोपखेलपर्यंत सुमारे 14.20 किलो मीटर लांबी येत आहे. यात काही प्रमाणात पिंपळेनिलख व दापोडी सीएमई येथील लष्कराच्या जागेचा समावेश आहे. पिंपरी महापालिका हद्दीतील मुळा नदी सुधार प्रकल्प पुणे महापालिकेसोबत संयुक्तरित्या राबविण्यात येणार आहे.

 

मुळा नदीचा पिंपरी-चिंचवड हद्दीतील बहुंताश भाग हा नैसर्गिक असल्याने या भागातील नदीकाठचा विकास करताना पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केला जाणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात नदीच्या कडेने असलेला ग्रीन बेल्ट विकसित करणे शक्य होणार आहे. या आराखड्यामध्ये नदीच्या कडेने नऊ मीटरचा रस्ता दर्शविण्यात आलेला आहे. बोपखेल ते दापोडी आणि बोपखेल ते विश्रांतवाडीपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूने नऊ मीटर रस्ता विकसित केला जाणार आहे. नदी सुधार योजनेचे काम असून हा रस्ता नदीपात्रातून होणार आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीबाहेरील रस्ता असल्याने संरक्षण विभागाच्या परवानगीचीही आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे काम लवकर होईल. बोपखेलवासीयांना हा नदी काठचा नऊ मीटर रस्ता दळणवळणासाठी मिळणार असल्याचे उपमहापौर हिरानानी घुले यांनी सांगितले.

 

महासभेची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया

 

मुळा, मुठा नदी सुधार प्रकल्प विस्तृत स्वरुपाचा असून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, काही डिफेन्स लॅन्ड यामध्ये येत आहेत. पुणे महापालिकेने त्यांच्या हद्दीतील प्रकल्पाचे 11 भागांमध्ये विभागणी केली. त्यापैकी काही भागांची निविदा मागविण्यात आली. त्याचअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये येणा-या 14.20 किलो मीटर लांबीसाठी प्रकल्प सल्लागाराने तयार केलेल्या सन 2021-22 च्या दराचे पूर्वगणपत्रकानुसार अंदाजपत्रकीय रक्कम 750 कोटी रुपये आहे.

 

प्रकल्पांतर्गत करावयाच्या भुसंपादनासाठी आवश्यक रक्कमेसह येणा-या रक्कमेस स्थायी समितीमार्फत प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर कामाची निविदा काढून काम लवकरच सुरु केले जाणार असल्याचे उमहापौर घुले यांनी सांगितले. महापौर उषा ढोरे आणि माझ्या प्रभागातून मुळा नदी जात असून दोघींच्या प्रभागात नदी सुधार प्रकल्पांअतर्गत नदीच्या कडेने नऊ मीटरचा रस्ता होणार आहे. महासभेत या कामाला प्रशासकीय मान्यता दिली जाईल असेही उपमहापौर घुले यांनी सांगितले.