September 12, 2025

सफाई व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा: राज्य सफाई कर्मचारी आयोगाची महापालिकेला सूचना

पुणे, १९ मे २०२५ : पुणे महापालिकेच्या सफाई आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर असून, त्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा सूचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोगाचा फरक मिळालेला नाही, तसेच महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील कर्मचाऱ्यांना घाण भत्ता दिला जात नाही. याशिवाय, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही आणि त्यांच्या फंडाविषयी माहिती पुरवली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत अध्यक्ष डागोर यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संदीप कदम, इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या आणि मागण्या आयोगासमोर मांडल्या.

प्रमुख मागण्यांमध्ये अपघात विमा योजनेची कार्डे वितरित करणे, २००५ नंतर नोकरीत सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय योजना लागू करणे, २०१२ साली बंद झालेली श्रम साफल्य योजना पुन्हा सुरू करणे, महर्षी वाल्मीकी पुरस्कार पुन्हा सुरू करणे, तसेच जेटिंग मशिनच्या टेंडरविषयी माहिती देणे यांचा समावेश होता. याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि अनुकंपा प्रकरणांची निकाली काढण्याची मागणीही करण्यात आली.

या सर्व मागण्या शासनाने गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना डागोर यांनी प्रशासनाला दिली. यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी जास्तीत जास्त प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले.