पुणे: निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविले, ३० लाखांचा गंडा घालणाऱ्या चौघांना अटक

पुणे, १८/०८/२०२१: निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून तब्बल ३० लाख रूपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी नारायण सोन्या जाधव, अनिल ज्योतिराम वाल्मिके , दत्तात्रय कुराडे व उत्तम कान्हुजी कुराडे ( सर्व रा. आळेफाटा, ता. जुन्नर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे. कोंढव्यातील हनीट्रॅपचा प्रकारानंतर आणखी घटना घडली आहे.

तक्रारदार एअरफोर्समधून २००१ साली निवृत्त झाले असून सध्या व्यवसाय करत आहेत. त्यांची विमानगर भागात कंपनी असून पँकेजिंगचे काम केले जाते. संबंधित तरूणी त्यांच्याकडे कामासाठी आली होती. त्यावेळी तिने त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर ती मोबाईलवर बोलू लागली. तिने तक्रारदार यांची पुर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्यांना काही दिवसांपुर्वी नारायण गाव येथे भेटण्यास बोलाविले. तक्रारदार भेटण्यास गेल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर तरूणीने तिच्या इतर चार साथीदारांना नातेवाईक म्हणून बोलवून घेतले. नातेवाईक आल्यानंतर तरुणीने तक्रारदार यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असल्याची खोटी माहिती नातेवाईकांना दिली. त्यामुळे चौघांनी तक्रारदार यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्याला कुऱ्हाड लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. शेवटी तडजोडीअंती त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेऊन तक्रारदार यांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांनी आणखी कोणाला अशा पध्दतीने फसविले का याचा शोध घेतला जात आहे.