पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ब्रिटिशकालीन नैसर्गिक झऱ्याचे पुनरूज्जीवन

पुुणे, २०/०१/२०२२: लष्कर परिसरात सोलापूर रस्त्यालगत असलेल्या ब्रिटिशकालीन नैसर्गिक झऱ्याच्या पुनरूजीवनाचे काम पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून (पीसीबी) हाती घेण्यात आले आहे.

सुमारे दीड एकरांवर पसरलेला हा झरा लष्कराच्या हद्दीतून जात असून, योग्य देखभाली अभावी, त्याची दुरावस्था झाली होती.

याबाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार म्हणाले, “राष्ट्रीय जलजीवन मिशनअंतर्गत देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील 75 नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाने दिली होती. यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील दोन जलस्रोतांचा समावेश आहे. त्यानुसार, बोर्डातर्फे हे पुनरूज्जीवन कार्य हाती घेण्यात आले. पुणे-सोलापूर रस्त्यालगत असलेला हा झरा योग्य देखभाली अभावी अतिशय दुरावस्थेत होता. तसेच याठिकाण मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. मात्र बोर्डाच्या अभियांत्रिकी बिभागातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हा झरा पुनरूजीवित करण्यात आम्हाला यश मिळाले.”

या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे सहाय्यक कार्यकारी अभियंता सुखदेव पाटील म्हणाले,”पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही झऱ्या लगतची घनदाट झुडपे साफ केली. त्यानंतर येथील गाळ काढला. पाणी पुन्हा प्रवाही झाल्याने ते हळू हळू स्वच्छ होऊ लागले. पाण्यात पुन्हा गाळ निर्माण होऊ नये, वाळू, माती, लहान दगड या घटकांचे पाण्यासोबत मिश्रण होऊ नये, म्हणून बाजूने दगडी बांधकाम करण्यात आले आहे. हे काम करताना, विभागासमोर मनुष्यबळाचा अडथळा होता. मात्र मशीन्सच्या सहाय्याने त्या अडचणीवर मात करण्यात आली. दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर हे कार्य पूर्ण झले. यासाठी बोर्डाचे 25 कर्मचारी कार्यरत होते. झरा पुनरूजीवित झाल्याने बोर्डाला आता बारमाही पाण्याचा एक स्रोत मिळाला आहे.”

या झऱ्याचा वापर सर्वसामन्यांसाठी खुला करायचा की नाही, याबाबत स्थानिक लष्करी प्रशासन निर्नय घेणार असल्याची माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.