कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने सौर उपकरणांच्या किंमतीत वाढ

पुणे: एका बाजूला सरकार सौर उर्जा उपकरणे वापरण्याकरिता प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे सौरऊर्जेच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. केंद्र व राज्य सरकारने ज्या पद्धतीने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नोंदणी / मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे त्यापार्श्वभूमीवर सौर उर्जेबाबत किमान निवासी क्षेत्रासाठी जीएसटी रद्द करण्याचा आग्रह महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोशिएशनच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सौर उर्जा उत्पादकांनी केला.  

कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे सर्व सौर उत्पादनाच्या किंमतीमध्ये 20 ते 30% वाढ झाली आहे. त्याबाबत सर्व उत्पादक सदस्यांनी सादरीकरण केले. हे सादरीकरण नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला (MNRE) पाठवण्यात येणार असून सौर उपकरणांची आधारभूत किंमत (बेंचमार्क) वाढविण्यासाठीदेखील मास्मा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडे आग्रह धरत आहेत. तसेच सर्व राज्यातील सोलर संस्था-संघटना मास्माला सहकार्य करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजेश मुथा म्हणाले.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा)ने नुकतेच सौर वॉटर हीटर, सौर ऊर्जा सिस्टीम यामध्ये वाढलेल्या दराबद्दल एक ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. धातूच्या दरामध्ये प्रचंड चढ-उतार होत आहेत. सर्व उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर पुढील ८ ते १० महिने दर कपात होऊ शकत नसल्याचे निदर्शनास आले.

लोखंड(एमएस), जी आय पाइप, अ‍ॅल्युमिनियमचे दर २५ ते ३०% वाढले, तांबेच्या किंमतीमध्ये ४०% ने वाढ झाली. चीन किंवा इतर देशातून आयात होणा-या सोलार वॉटर हीटर मध्ये सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या ग्लास निर्मित ट्यूबच्या किंमतींमध्ये ४०% वाढ झाली. चीनमधील पुरपरिस्थिने पुरवठा खंडित झाल्यामुळे सौर मॉड्यूलच्या किंमती २०२० च्या मध्यापासून वाढू लागल्या. शिपिंग कंटेनरच्या कमतरतेमुळे वाहतुकीचे दर ५ ते ८% ने वाढले आणि याचा परिणाम गेल्या सहा महिन्यापासून सौर मॉड्यूल ची ३०% ने भाव वाढ होण्यात झाला.

सेमीकंडक्टर वेफर्सच्या कमतरतेमुळे, सोलर ऑफ ग्रिड आणि ग्रिड इनव्हर्टरवर मॅन्युफॅक्चरिंग किंमत १४ ते २०% वाढली. सौर इन्व्हर्टरवरील आयात शुल्कात १५% झालेली वाढ यामुळे इन्व्हर्टर चे दर १० ते १५% ने वाढले.

मास्मा अध्यक्ष राजेश मुथा यांनी संघटनेतर्फे सर्व सौर उद्योजकांना सध्याच्या आणि भविष्यातील किंमतीतील वाढीची नोंद घेण्याची विनंती केली आहे. प्रत्येकाने सोलर पॅनेल, इन्व्हर्टर, केबल आणि इतर मॅटेरियल खरेदी करताना तसेच त्यानुसार ग्राहकांना कोटेशन देताना काळजी घेतली पाहिजे. सौर प्रकल्पाची नवीन योजना आखताना त्यांना मिळालेल्या कोटेशन मधील दरवाढ, लागणारा जादा वेळ याबद्दलची शहानिशा करून घेणे गरजेचे आहे. ग्राहकांनी आर्थिक व मानसिक त्रासापासून वाचण्याकरिता महाराष्ट्रातील मास्मा सभासदांशी अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी मुथा यांनी केले.

महाराष्ट्रातील सर्व सौर उद्योजक, उत्पादक मोठ्या संख्येने ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी झाले. मास्मा अध्यक्ष राजेश मुथा, सचिव जयेश अकोले, खजिनदार शशिकांत वाकडे, सामाजिक सचिव साकेत सुरी, संचालक संजय कुलकर्णी, समीर गांधी, संजय देशमुख, प्रदीप कुलकर्णी, अमित देवताळे, हनुमंत भोसले उपस्थित होते. मंगल अकोले, रेवणकर, कौशल, विजय सौदी, सोलर पॅनल उत्पादक ए.के. सिंघ, संजय शेट्टी, अमित अरोकर, पटेल, विजय घाटोळे, सोलर इन्व्हर्टर उत्पादक संजय मुसळे, विनोद रवी यावेळी वेबिनारला उपस्थित होते.