September 12, 2025

पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था : शहरात ठिकठिकाणी खड्डे, पुणे महापालिकेचा ७२४ खड्डे बुजविल्याचा दावा

पुणे, २३ मे २०२५ : पुणे शहरात पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त अनेक अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यात साचलेल्या पाण्यामुळे व पसरलेल्या खडीमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आतापर्यंत शहरातील ७२४ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे.

शहरातील उपनगरे, समाविष्ट गावांमधील आणि अवजड वाहतुकीच्या मार्गावरील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणानंतर पावसाने डांबर बाजूला फेकल्यामुळे रस्त्यावर खडी पसरली आहे. तसेच, चेंबरच्या झाकणाभोवतीचा डांबर निघाल्याने तेथेही खड्डे पडत असून, त्यात पाणी साचून धोका अधिक वाढतो आहे.

महापालिकेला खड्ड्यांविषयी नागरिक, पीएमसी केअर अ‍ॅप, भरारी पथके व वाहतूक पोलिस यांच्याकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. १ एप्रिल ते २१ मेदरम्यान महापालिकेच्या पथ विभागाला ७७८ खड्ड्यांची माहिती प्राप्त झाली. त्यापैकी ७२४ खड्डे कोल्डमिक्स आणि केमिकल काँक्रीट वापरून बुजवण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. पावसाने उघडीप दिल्यानंतर उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहणार आहे.

पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, “दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरु झाला आहे. तरीही, पडणाऱ्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती केली जात आहे. ७२४ खड्डे बुजविले गेले असून उर्वरित खड्ड्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाईल. तसेच, रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठीही उपाययोजना सुरु आहेत.”