नवी दिल्ली, 10 मे 2021: कोविड महामारीचा प्रतिबंध तसेच व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या चाचण्या, संपर्कशोध, उपचार आणि कोविड योग्य वर्तणूक यांसह लसीकरण हा केंद्र सरकारच्या पाच कलमी धोरणाचा अविभाज्य घटक आहे. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेला पाठबळ पुरवीत आहे.
केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत जवळजवळ 18 कोटी (17,93,57,860) मात्रांचा मोफत पुरवठा केला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यापैकी, वाया गेलेल्या मात्रांची आकडेवारी गृहीत धरून एकूण 16,89,27,797 मात्रा वापरण्यात आल्या आहेत.
पुढील काळातील लसीकरणासाठी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे अजूनही कोविड प्रतिबंधक लसीच्या 1 कोटीहून अधिक (1,04,30,063) मात्रा शिल्लक आहेत. काही राज्यांनी संरक्षण दलांना पुरविलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची नेमकी गणना झाली नसल्याने, त्या राज्यांनी केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या मात्रांपेक्षा वाया गेलेल्या मात्रांसह अधिक मात्रा वापरल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
तसेच, यापूर्वी पुरवण्यात आलेल्या मात्रांव्यतिरिक्त येत्या 3 दिवसांत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 9 लाखांहून अधिक (9,24,910) मात्रा पुरविण्यात येणार आहेत.
More Stories
पंतप्रधानांनी आपल्या पुणे दौऱ्यात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे केले उद्घाटन
पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे