संपूर्ण सोसायटीचेच ‘आरटीपीसीआर’, ऑमिक्रॉन बाधित सापडल्यानंतर पुणे महापालिकेची उपाययोजना

पुणे, ५/११/२०२१: ओमिक्रॉन या कोरोना व्हेरिएंटची बाधा झालेला पहिला रूग्ण पुणे शहरात सापडला असून, महापालिकेच्या वतीने संपर्कात येणाऱ्या संपूर्ण सोसायटीचेच आरटीपीसीआर ही प्रयोगशाळेतील चाचणी करण्यात आली आहे.

 

जगभरातील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण असल्यामुळे राज्यात अतिजोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याच नेहमीच्या सर्वेक्षणातून ४७ वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तो नोव्हेंबर महिन्यात फिनलंड येथे गेला होता.

 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निदानातून हे पुढे आल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच प्रयोगशाळेत घेतली जाणारी आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे. लवकरच त्यांचे निदान पुढे येईल. महापालिकेच्या वतीने ओमिक्रॉन बाधित रुग्णांसाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले,‘‘ओमिक्रॉन बाधित या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच कोरोना चाचण्या करण्यात येत आहे. ज्यांना कोरोनाची बाधा झाली असेल अशांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येईल. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना नायडू रूग्णालयात दाखल करण्यात येईल, ज्यांना लक्षणे दिसत नाही अशांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.’’

 

कॉन्टेक्ट ट्रेसिंग आणि नियमित सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. बाधित रूग्णांचे लक्षणांच्या आधारे उपचार आणि विलगिकरण करण्यात येणार आहे.