मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायण पूजा घातल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात राज्यपालांकडे तक्रार ; पुण्यातील मानवी हक्क कार्यकर्त्याने केली तक्रार

पुणे, ७ जुलै २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायणाची पुजा घातल्याने त्यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी ही तक्रार केली आहे.

याबाबत ॲड. शिंदे म्हणाले,” महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर संविधान आणि कायद्याला साक्ष ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधी आज मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायणाची पुजा घातल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली आहे.”
एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या सरकारने ४ जानेवारी २०१७ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार कोणत्याही सरकारी, निमसरकारी कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करता येणार नाहीत. देवी देवतांचे फोटो लावता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी हा आदेश डावलला आहे. सद्यपरिस्थिती विचारात घेता, संबंधित घटनेची तात्काळ दखल घेऊन, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत खुलासा मागविण्यात यावा, माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संविधानिक जबाबदारी व कर्तव्याची योग्य ती समज देण्यात यावी, अशी मागणी ॲड शिंदे यांनी केली आहे.