सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ५ हजार कोविड सॅम्पल टेस्ट पूर्ण: ३० स्वयंसेवकांच्या मदतीने मोफत टेस्टिंग

पुणे, ११/०८/२०२१: कोविड काळात अनेक पालक जिथे आपल्या मुलांना घराबाहेर पडू नये असा सल्ला देत होते त्याच काळात विद्यापीठात ‘कोविड सॅम्पल टेस्टिंग’ सुरू होते तेही ३० विद्यार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने. आज (१२ ऑगस्ट ) रोजी असणाऱ्या युवा दिनाच्या निमित्ताने या विद्यार्थी स्वयंसेवकांच्या कामाची दखल घेत त्यावर टाकलेला प्रकाश.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या ‘कोविड सॅम्पल टेस्टिंग’ ला विद्यापीठाच्या आण्विक निदान संशोधन केंद्रात २७ मे २०२१ पासून सुरुवात करण्यात आली. यानुसार सरकारी हॉस्पिटलमधून येणाऱ्या सॅम्पलची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येत आहे. ‘आयसर’ मधून प्रशिक्षण घेऊन आलेले विद्यापीठातील दहा प्राध्यापक व विविध महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या एकत्रित कामातून आजवर ५ हजार ‘सॅम्पल टेस्टिंग’ पूर्ण झाले आहे.

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली असून आपले शिक्षण सांभाळत हे विद्यार्थी रोज काही तास या केंद्रामध्ये काम करतात. सामाजिक उत्तरदायित्वाच्या हेतूने स्वखर्चातून विद्यापीठाने हे आण्विक निदान संशोधन केंद्र उभारले असल्याने येथील प्राध्यापक व स्वयंसेवक कोणत्याही मानधनाशिवाय येथे काम करतात.

खासगी रुग्णालयात या चाचणीसाठी ६०० ते ८०० रुपये घेतले जातात, त्यानुसार विद्यापीठाकडून आतापर्यंत जवळपास ३० लाखांच्या टेस्ट मोफत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्राच्या नोडल अधिकारी डॉ. करिश्मा परदेसी यांनी दिली.

कोविड काळात विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सिरो सर्व्हे, कोविड सॅम्पल टेस्टिंग, रक्तदान, जनजागृती अशा विविध माध्यमातून स्वयंसेवक म्हणून काम केले. हे ‘कोविड योद्धा’ सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असून विद्यापीठाला यांचा सार्थ अभिमान आहे. – प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ