September 24, 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन, प्रमुख वक्ते म्हणून एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी उपस्थित राहणार

पुणे, १३/१२/२०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे गुरूवारी, १४ डिसेंबर रोजी हे व्याख्यान घेण्यात येत आहे. यावर्षी एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएसएम एडीसी हे ‘भारतीय हवाई दलाचे समकालीन आणि भविष्यातील रेडी एरोस्पेस फोर्समध्ये परिवर्तन’ या विषयावर व्याखान देणार आहेत. ऑक्टोबर २०२१ पासून भारतीय हवाई दलाचे प्रमुख असलेले एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे देशातील २७ वे हवाई दल प्रमुख आहेत. त्यांना आतापर्यंत ३,८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून ते मिग -२९ विमानांचे तज्ज्ञ आहेत. याआधी त्यांनी वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही काम केलं आहे.

‘गेटवे ऑफ नॉलेज’ गेटची स्थापना करणाऱ्या जनरल बी. सी. जोशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा वारसा आणि दूरदृष्टींचा सन्मान करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाने १९९५ मध्ये जनरल बी. सी. जोशी यांच्या नावे वार्षिक व्याख्यानमाला सुरू केली होती. सन २००५ पासून जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमाला भारतीय लष्करी तिन्ही दलाच्या सेवा प्रमुखांपैकी एकाद्वारे वार्षिक आधारावर रोटेशनद्वारे स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते.

या व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रीय एकत्रीकरण, मूलभूत मूल्ये, भारतीय सांस्कृतिक सभ्यता, पर्यावरण संरक्षण, इको- डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर आजपर्यंत विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. या व्याख्यानाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर हे पाहुणे म्हणून तर प्रभारी कुलसचिव आणि सामरिक शास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय खरे हे मुख्य निमंत्रक आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या व्याखानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागप्रमुखांनी केले आहे.

विद्यापीठातील सामारिक शास्त्र विभाग वर्षभर यासारख्या अनेक स्मृती व्याख्यानांचे आयोजन करत असतो. १९६३ सुरू झालेल्या या विभागाने देशाला संरक्षण क्षेत्रातील अनेक तज्ञ दिले आहेत. १९८५ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन आर्मी रेसिडेंट स्कॉलर्स प्रोग्रामच्या माध्यमातून विभागाचे भारतीय सैन्यासोबतचे संशोधन सहयोग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नुकतेच या विभागाने छत्रपती शिवरायांची युद्धनीती, त्यांची धोरणे यांचा अभ्यास करता यावा यासाठी एक वर्षांच्या पदव्युत्तर पदविका स्वतंत्र अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे.