सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि समरिकशास्त्र विभागाला संरक्षण मंत्रालयाची स्वतंत्र ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’

पुणे, १७/०८/२०२१: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व समरिकशास्त्र विभागात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. ही ‘चेअर ऑफ एक्सलेन्स’ मिळवणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व समरिकशास्त्र विभाग हा भारतातील एकमेव विभाग आहे.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने लष्करी इतिहास व सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वसामान्य जनतेस माहिती मिळावी तसेच लष्कराचे धोरण, राष्ट्रीय सुरक्षेसबंधीची आव्हाने, युद्धविषयक नीती याबाबत राष्ट्रीय पातळीवर अभ्यास व्हावा, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी भारतभरातील विद्यापीठाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी १०० विद्यापीठाकडून अर्ज करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावातून संरक्षण व समरिकशास्त्र विभाग व विद्यापीठाची राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कामगिरी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ स्थापन करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

याआधी संरक्षण व समरिकशास्त्र विभागमध्ये भारतीय भुसेनेद्वारे १९९४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तसेच भारतीय वायुसेनेद्वारे फेब्रुवारी २०२० मध्ये ‘मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग’ यांच्या नावे ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ मिळाले आहे.

बदलत्या भू-राजनैतिक, भू राजकीय पद्धतीचा विचार करता विभागाने नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, पाच वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम यांसह नवीन उपक्रम राबविले जात आहेत.

संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रतिष्ठेची ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ मिळाल्याबद्दल विद्यपीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

“संरक्षण व समरिकशास्त्र विभाग हा देशातील एकमेव विभाग आहे ज्यामध्ये भू सेना, वायू सेना व संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयाने ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ ची स्थापना करण्यात आली आहे. पुढील काळात भारतीय नौसेनेसोबतही ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ स्थापन करण्याचा आमचा मानस असून यासाठीचा प्रस्तावही नौसेना मुख्यालयात पाठविला आहे.” – डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व समरिकशास्त्र विभाग

“संरक्षण मंत्रालयाद्वारे विभागाला ‘चेअर ऑफ एक्सलेन्स’ मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद आहे. विद्यार्थ्यांना यामुळे या विषयांमध्ये संशोधन करण्याची संधी निर्माण झाली आहे.” – प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ