मुंबई, 16/12/2021 : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन