पुणे, ११ जून २०२५: शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी याकरीता प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी. बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम करीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा, असेही कुमार म्हणाले.
श्री. भोसले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ३२१ स्कूल बस तसेच ६५० इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ४१४ स्कूल बस व २०८ इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार