पिंपरी : आपत्ती काळात शाळांनी सौजन्य दाखवत किमान १५ टक्के फी कपात करावी – महापालिका आयुक्त राजेश पाटील

पिंपरी, दि.०३ जुलै २०२१ – कोविड संसर्गजन्य रोगाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटातून जावे लागत आहे. अशा प्रसंगी शाळांनी विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सौजन्यता दाखवावी असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापनाबाबत फी संदर्भात वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने आज आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस या शाळांचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांच्या समवेत आयुक्त पाटील यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे उपस्थित होते.
ओरिसामधील मयुरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना बालमजुरीमुक्त जिल्हा करुन तेथील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचा संदर्भ देत आयुक्त पाटील यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखीत केले. शिक्षकांच्या सहकार्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपण उच्चपदापर्यंत पोहोचू शकलो असेही त्यांनी नमुद केले.  आयुक्त पाटील म्हणाले, शिक्षण व्यवस्थापनाने सकारात्मक भुमिका ठेवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होते. सध्या कोविड संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीतून आपण मार्गक्रमण करत आहोत, यामध्ये अनेक कुटुंब बाधित झाले आहेत, अनेकांचे रोजगार गेले आहेत, काही बालकांनी आपले पालक गमावले आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीतून पुढे जात असताना लोकसेवेला अधिक महत्व देण्याची ही वेळ आहे. फी न भरल्यामुळे दाखले अथवा रिपोर्ट कार्ड न देणे, ऑनलाईन शिक्षण बंद करणे, शाळेतच वह्या पुस्तके गणवेश खरेदीची सक्ती करणे, शालेय फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकणे, आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे यांसारख्या वाढत्या तक्रारी वेदना देणा-या ठरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारे संवेदनाहीन वागणे समाजहिताच्या दृष्टीने चांगले नाही. विद्यार्थ्यांची अशा प्रकारे होणारी पिळवणुक सहन केली जाणार नाही. असे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त पाटील यांनी यावेळी दिला.
कोरोनाने पालकांचा मृत्यू झाल्याने काही मुले अनाथ झाली आहेत. अशा मुलांना दत्तक घेवून त्यांना शिक्षण देण्यासाठी खाजगी शाळांनी पुढाकार घ्यावा. कुटुंबाच्या सर्वांकष परिस्थितीचा विचार करुन शालेय फी मध्ये सवलत द्यावी, आपत्कालीन परिस्थितीत सौजन्यता दाखवून किमान १५ टक्के फी कमी करावी, आरटीई अंतर्गत असलेले प्रवेश तात्काळ द्यावेत, पालकांशी संवाद साधून शालेय फी बाबत निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते वृध्दींगत करण्यासाठी वृक्षारोपण मोहिम राबवावी, कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये जनजागृती करण्यासाठी अचूक आणि योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सुचना आयुक्त पाटील यांनी बैठकीत केल्या. काही व्यक्ती शाळेला हेतुपुर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने कृत्य करत असतील तर अशा वेळी महापालिका प्रशासनाचे सहकार्य शाळा व्यवस्थापनाला असेल, असे ते म्हणाले. पिंपरी चिंचवड शहराचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले.