वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षक अधिकाऱ्याचे कर्करोगाने निधन

पुणे, ०५/०९/२०२२: पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती विवेक देसाई (वय -५०)यांचे रविवारी रात्री कर्करोग आजाराने निधन झाले आहे. त्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात विशेष शाखेत कार्यरत होत्या. सोमवारी बिबवेवाडी येथील सिध्दी नगरी , विद्यासागर सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

 

 

स्वाती देसाई या मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गणेशवाडी गावच्या रहिवासी आहे.त्यांनी जवळपास २५ हून अधिक वर्षे महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदावर सेवा केली आहे. त्यांनी काहीकाळ सीआयडी, एसबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले होते. देसाई यांनी पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेतील आर्थिक विभागात काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. सदर जागी सुमारे दोन वर्षापेक्षा अधिक काळ काम करत त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. सहकानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक जटील गुन्ह्यांचा तपास ही लावल्याने त्या चर्चेत राहिल्या होत्या.लहान मुलावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले होते.प्रेयसीच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणार्‍याला तातडीने पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले होते. पीएमपी बसमध्ये चोर्‍या करणार्‍या चोरट्यांची टोळी त्यांनी पकडली होती. सहकारनगर पोलीस ठाण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर त्यांची बदली पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात विशेष शाखेत सहा महिन्यापूर्वी झाली होती. यादरम्यान त्यांचे कर्करोग बाबत उपचार रुग्णालयात सुरू होते. डॉक्टरांच्या औषधाने त्यांना काहीकाळ फरक पडला असल्याने त्यांची तब्येत व्यवस्थित होती. मात्र, विशेष शाखेत काम करत असतानाच त्यांचा कर्करोगाने अकाली मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वाती देसाई यांचे अचानक निधन झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले.