पुणे, ०१/११/२०२५: शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या ( एसटीपी) उभारणी आणि नूतनीकरणाच्या कामाला आता गती मिळणार असल्याचे दिसत आहे. पुणे महापालिकेतर्फे नुकतेच या कामासाठी अमृत २.० योजनेंतर्गत १२२३ कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबतची माहिती शुक्रवारी ( दि.३१) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सध्या पुणे महापालिका क्षेत्रांर्गत १० सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहेत. या केंद्रांची एकत्रित क्षमता ३६२ एम एल डी इतकी आहे. मात्र हे प्रकल्प जुने असल्याने केवळ ५० टक्के क्षमतेने कार्यान्वित असून, शहरात निर्माण होणारे आणि प्रक्रिया होणाऱ्या सांडपाणीचे प्रमाण बघता, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे विविध संस्थांच्या अभ्यासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनुसार योग्य नसल्याने महापालिकेला दरवर्षी १०० कोटी रुपयांहून अधिक दंड भरावा लागत आहे. त्यामुळेच एस टी पी प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न केले जात आहे.
प्रस्तावित प्रकल्पांतर्गत शहरातील भैरोबा नाला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि नायडू सांडपाणी शुद्धीरण प्रकल्प यांची पुनर्बांधणी होणार आहे. तर नरवीर तानाजी वाडी, बोपोडी, एरंडवणे आणि विठ्ठलवाडी येथील प्रकल्पांमधील यंत्रणा अद्ययावत केल्या जाणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना राम म्हणाले, ” या प्रकल्पांतर्गत दोन नवीन एसटीपी प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे, तर चार केंद्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश केला जाणार आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मानांकनानुसार सांडपाणी शुद्धीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारेल.
प्रस्तावित प्रकल्पांमुळे शहरातील सांडपाणी शुद्धीकरण क्षमतेत ८९ एमएलडीने वाढ होणार आहे.”
या कामासाठी विश्वराज इन्व्हायरमेंट कंपनीने १,३३२ कोटी रुपयांची निविदा सादर केली होती. त्यांनी ११० कोटी रुपयांनी दर कमी केल्याने निविदा पालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा सुमारे साडेतीन टक्के अधिक राहिली. पंधरा वर्षांच्या कालावधीचा विचार करता हे दर परवडणारे आहेत, असेही राम यांनी सांगितले.

More Stories
वासोटा किल्ला १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुला; चार महिन्यांनंतर पुन्हा दुर्गभ्रमंतीसाठी हिरवा कंदील
Pune: “वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सामूहिक गान करण्याबाबत आयोजन, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
Pune: शिवसेना महिला आघाडीचे आक्रमक आंदोलन – रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी!