December 12, 2025

शिवसेनेची १६५ जागा लढविण्याची तयारी – महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर

पुणे, ११ डिसेंबर २०२५ : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आम्हाला केवळ ३०-३५ जागा देणार असेल तर ते चालणार नाही. आम्हाला जास्त जागा हव्या आहेत. युती करायची की नाही याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली, पण आम्ही १६५ जागांची तयारी करत आहोत, ही निवडणूक शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढणार आहोत, असे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या अर्जाचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

पुणे महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. त्याला रोखण्याचे काम आम्ही करणार आहोत. पुण्याचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी युती करायची की नाही हे अजून ठरलेले नाही. आम्ही आमची १६५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी पूर्ण केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते चर्चा करून युतीसंदर्भातील निर्णय घेणार आहेत. पुण्यात युतीमध्ये जर शिवसेनेला केवळ ३० जागा देणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही आमची पूर्ण तयारी करत आहोत, असेही धंगेकर यांनी सांगितले.

मुंढवा जमीन प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जे चुकीचे वागत आहेत. त्यांच्याविरोधात मी बोलणार, असेही धंगेकर यांनी सांगितले.