October 24, 2025

गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचे ‘चूल पेटवा’ आंदोलन.

पुणे, १० एप्रिल २०२५: केंद्र सरकारने गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ केल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचे गणित बिघडल्याचे म्हणत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने या दरवाढ विरोधात चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील फडके हाऊस चौक येथे शिवसैनिकांच्या वतीने चूल पेटवत चुलीवर भाकरी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सिलेंडरची महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? अशा जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला शिवसैनिक म्हणाल्या की आज जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या असून गरीब लोकांनी करायचं काय? या सरकारकडून अच्छे दिन येणार असे सांगितले गेले, मात्र अच्छे दिन हे आता भूतकाळात जमा झाले असून सरकारकडून अच्छे दिन हे येणार नाहीत.

तसेच लाडक्या बहिणींना एका हाताने दीड हजार रुपये सरकार देत आहे तर दुसऱ्या हाताने पैसा वसूल केला जात आहे. सत्तेवर येण्यासाठी फक्त लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून महागाई वाढवून सरकार महिलांची फसवणूक करत असल्याचे यावेळी महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.