पुणे, २० ऑगस्ट २०२५ : सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी ते माणिकबाग उड्डाणपूल बांधकाम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अडकला आहे. या विलंबामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुणे शहराने आज थेट पुलावर “ॐ फट स्वाहा आंदोलन” छेडले. “मुख्यमंत्री-पालकमंत्री-नगरविकास मंत्री प्रकट व्हा, अन्यथा जनता पूल स्वतः उघडेल” असा इशारा आंदोलकांनी दिला.
मंत्रोच्चारासह सरकारला इशारा:
आंदोलनादरम्यान पुलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर होम-हवन करण्यात आले. यावेळी “ॐ फट स्वाहा”च्या घोषांसह पूल तातडीने वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. “सिंहगड रस्त्यावरील जनतेला ट्रॅफिक कोंडीत अडकवणाऱ्या सरकारचा निषेध होवो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
“जनतेच्या पैशातून बांधला पूल, मग उद्घाटनाची अडवणूक का?”
शहरप्रमुख संजय मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत म्हटले, “जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेला पूल उद्घाटनासाठी तयार आहे. पण सत्ताधारी केवळ सोहळ्याच्या हव्यासापायी नागरिकांना त्रास देत आहेत. मुख्यमंत्री पुण्यात असूनही उद्घाटनासाठी आले नाहीत, कारण दोन दिवसांच्या पावसातच पुलावर खड्डे पडले आहेत. जर पुढील पाच दिवसांत पूल वाहतुकीसाठी खुला झाला नाही, तर आम्ही शिवसैनिक जनतेसह स्वतःच्या पद्धतीने उद्घाटन करू.”
या आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या पुणे महापालिकेचे प्रकल्प अधिकारी संभाजी कोटकर यांनी, “पुढील चार दिवसांत सर्व कामे पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी उघडला जाईल” असे आश्वासन दिले.
या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पदमा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकुळ करंजावणे, अनंत घरत, किशोर रजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, सूरज लोखंडे, वैभव हनमघर, पराग थोरात, दिलीप पोमण, राजाभाऊ चव्हाण, शिवा पासलकर, नाना मरगळे, नागेश खडके, प्रसाद गिजरे, मिलिंद पत्की, उमेश सुर्वे, अरुण घोघरे, दत्ता घुले, संग्राम गायकवाड, निलेश वाघमारे, महेश विटे, गणपत खटपे, धनंजय खाडे, प्रथमेश भुकन, कल्पेश वाजे, केतन शिंदे, विनायक नलावडे, आकाश यादव यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर