September 11, 2025

सवलतीच्या दरात आता १५ ऑगस्ट पर्यंत पाहता येणार शिवसृष्टी

पुणे, दि. १४ जुलै, २०२५ : मागील दोन महिन्यात शिवसृष्टी प्रकल्पाला नागरिकांच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर शिवसृष्टी पहायला येणाऱ्यांसाठी असलेली दरातील सवलत येत्या १५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती शिवसृष्टी प्रकल्पाचे निर्माते असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी कळविली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कदम पुढे म्हणाले की, “महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेला शिवसृष्टीसारखा प्रकल्प जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा या हेतूने पुण्यातील अभय भुतडा फाउंडेशन यांच्या वतीने काही महिन्यांपूर्वी प्रतिष्ठानला रु. ५१/- लाखांचा निधी सुपूर्त करण्यात आला होता. या निधीचा वापर करून, या ऐतिहासिक प्रेरणास्थळाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, १५ मे ते १५ जुलै, २०२५ या दोन महिन्याच्या कालावधीत शिवसृष्टी प्रकल्पास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून नाममात्र रु. ५०/- इतके प्रवेशशुल्क घेण्यात आले. या दरम्यान तब्बल १ लाख नागरिकांनी प्रकल्पाला भेट देत शिवछत्रपतींचा दैदिप्यमान काळ, त्यांची दूरदृष्टी, त्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न अनुभविले.”

आशिया खंडातील सर्वांत मोठा ऐतिहासिक प्रकल्प असलेल्या या असामान्य प्रकल्पाला भेट द्यायची आणखी शिवप्रेमींची इच्छा आहे, त्यामुळे लोकाग्रहास्तव प्रकल्पाला भेट देण्यासाठी असलेला सवलतीचा दर आपण येत्या १५ ऑगस्ट पर्यंत तसाच ठेवत असून आता १५ ऑगस्ट पर्यंत शिवप्रेमींना प्रती व्यक्ती ५० रुपये याच सवलतीच्या दरामध्ये शिवसृष्टी प्रकल्पाला भेट देता येणार आहे, असेही कदम यांनी नमूद केले.

शिवभक्त, इतिहासप्रेमी, विद्यार्थी, कुटुंबे आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच या वाढीव सुवर्णसंधीचा लाभ घेत शिवसृष्टीला भेट द्यावी असे आवाहन देखील यावेळी जगदीश कदम यांनी केले.