धक्कादायक…विवाहबाह्य संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीचा केला खून, पत्नीसह प्रियकरला अटक

पुणे, दि. ६ (प्रतिनिधी)- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याला कोरोना झाल्याचा बनाव करीत अंत्यविधी उकरून पुरावे नष्ट करणाऱ्याना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. अश्विनी मनोहर हांडे आणि गौरव मंगेश सुतार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनोहर नामदेव हांडे (रा. उरळी देवाची, हवेली ) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना २४ मेला सकाळी सहाच्या सुमारास घडली होती.

आरोपी गौरव आणि मनोहरची पत्नी अश्विनी यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये मनोहर अडथळा ठरत होता. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मनोहरला समजली होती. दरम्यान, ८ मे ला मनोहरला कोरोना झाल्यानंतर तो घरीच राहून उपचार घेत होता. नेमकी संधी साधून अश्विनी आणि गौरव यांनी मनोहरला मारण्याचा डाव रचला. त्यानुसार २३ मेला रात्री अश्विनीने पती मनोहरला दुधातून झोपेच्या गोळ्या खाउ घातल्या. त्यानंतर तो झोपी गेल्याची खात्री झाल्यानंतर प्रियकर गौरवला घरी बोलावून घेतले. त्यानंतर पत्नी अश्विनी आणि प्रियकर गौरव यांनी मिळून मनोहरचा गळा दाबून खून केला. त्यानंतर गौरव तेथून निघून गेला.

२४ मेला सकाळी अश्विनीने तिच्या आईला मनोहर झोपेतून उठत नाही. त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर काहीजणांच्या उपस्थित मनोहरचा अंत्यविधी उरकण्यात आला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपास सुरू असताना मनोहरच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अश्विनी आणि गौरव यांच्यावर पाळत ठेउन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, मनोहर प्रेमात अडथळा निर्माण करीत होता. त्याच कालावधीत मनोहरला कोरोना झाल्यामुळे त्याला मारले तरी कोणाला संशय येणार नसल्यामुळे खून केल्याची कबुली दोघांनी दिली आहे