पाण्यासाठी रेनट्री फाऊंडेशनकडून लव्ही गावात श्रमदान

पुणे, १२/०५/२०२२: मे महिना हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी महत्वाचा महिना मानला जातो कारण याच महिन्यात पावसाळ्या पूर्वीच्या सगळ्या तयारी केल्या जातात. पावसाळ्याचे पाणी संपूर्ण वर्षभर कसे पुरावे यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थ तयारीला लागतात. पुण्यातील रेनट्री फाऊंडेशन वेल्हे तालुक्यातील नऊ गावांमध्ये शाश्वत भूभाग व्यवस्थापन या विषयावर गेली ३ वर्षे काम करत आहे.

 

पाणी सुरक्षा हा रेनट्रीचा महत्वाचा विषय आहे. गावातील लोकांना वर्षभर पाणी पुरावे आणि डोक्यावरून हांडे वाहायची गरज पडू नये म्हणून ११ मे रोजी रेनट्रीकडून लव्ही गावात श्रमदान आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये जवळपास २०० गावकरी, मुले, महिला, वृद्ध, महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. संपूर्ण गाव एकत्र येऊन स्वकष्टाने पाण्याच्या प्रश्नासाठी काम करताना पाहण्याचे हे एक सुंदर दृश्य होते.

 

रायगडाच्या पायथ्याशी वसलेलया लव्ही, ददवडी, मेरावणे, गुंजवणे, अवळी, साखर, घावर, चिरमोडी, आणि फणशी या गावांना पावसाळा संपताच जवळपास ३ महिने पाण्याच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. डोक्यावरून हांडे आणत महिलांना बरीच पायपीट करावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी रेनट्रीकडून लव्ही ग्रामपंचायतीच्या मदतीने गुंजवणे नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी गावकऱ्यांना घेऊन श्रमदानाचे आयोजन केले होते. सकाळी ८ वाजता सुरु झालेले हे श्रमदान संध्याकाळपर्यंत चालेले. ” महाराष्ट्रात जूनमध्ये पावसाळा सुरु होतो. गुंजवणे नदी पात्रातील गाळ काढल्यामुळे पावसाचे पाणी या भागात अधिक प्रमाणात साठून राहील आणि पुढील संपूर्ण एक वर्ष हे पाणी या गावांना मुबलक प्रमाणात मिळत राहील. यामुळे पावसाळ्यानंतर जे ३ महिने येथील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तो करावा लागणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. पाण्याच्या प्रश्नासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन श्रमदान करत आहे हे एक सुखद दृश्य आहे. रेनट्री फाऊंडेशन गेली ३ वर्षे या भागात काम करत आहे. लोकांच्या मदतीने गावाचा कायम टिकणारा पर्यावरणपूरक विकास घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे. या पूर्वी झालेल्या श्रमदानासदेखील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. श्रमदानातून गावकऱ्यांमध्ये एकी तर वाढतच आहे त्याचबरोबर आपल्या हक्काचे पाणी आपण स्वकष्टातून कमावले आहे ही भावनादेखील निर्माण होत आहे. आजच्या श्रमदानामुळे लव्ही आणि आसपासच्या गावांना वर्षभर पाणी मिळत राहील. या गावांच्या विकासासाठी रेनट्री कटिबद्ध आहे”, अशी माहिती रेनट्री फौंडेशनच्या संस्थापक लीना दांडेकर यांनी दिली.

 

गावातील प्रत्येकाने या श्रमदानात भाग घेतला होता. गाणी म्हणत, फुगड्या खेळत गावकऱ्यांनी स्वकष्टातून पाण्याचा मार्ग मोकळा केला. “आमच्या गावाला वर्षभर पाणी पुरत नाही. ३ महिने डोक्यावर हांडे ठेऊन पाणी घेऊन यावे लागते. आजच्या या श्रमदानामुळे नदीचा गाळ निघाला आहे आता बंधाऱ्यात जास्त पाणी साठेल आणि आम्हाला वर्षभर पाणी पुरेल अशी अशा आहे”, अशी प्रतिक्रिया गावातील गावकरी शंकर रेणुसे यांनी दिली.