पाणी तुंबत असल्याने महापालिकेच्या कामाची चौकशी होणार

पुणे, 15 ऑक्टोबर 2022: पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. वारंवार हे प्रकार घडत असल्याने महापालिकेच्या कामाची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील हे पुणे दौर्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरात थोडा मोठा पाऊस सुरू होताच काही मिनिटात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यासह इतर भागात पाणी तुंबले आहे. ‘पावसाळी गटारे स्वच्छ केली आहेत, त्यातून पाणी वाहून नेण्याची पुरेशी क्षमता आहे’ असा दावा करणाऱ्या महापालिकेचा खोटारडेपणा यामुळे समोर येत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, यंदा पावसाचे गणित कळत नाहीय, कमी वेळात खूप पाऊस पडतो आहे. पाणी तुंबत असल्याने नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यात येतील. रस्त्यावरील पाणी वाहून घेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाऊस काल कमी वेळेत पडला. परंतु वारंवार पाणी का तुंबत आहे चौकशी करण्यात येईल.
जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान झाले आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेल. पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. गैरप्रकारात संबंधित उमेदवारांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, सरकारकडून कारवाई केली जाईल.

पुण्यात सेक्सटाॅर्शनचे प्रकार वाढत आहेत. हे गुन्हेगारीचा नवा प्रकार आहे. तरुणी तरुणांना जाळ्यात ओढवून घेऊन त्यांच्याकडून अश्लिल फोटो, व्हिडिओ मागवून घेतात व नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. यातून पुण्यात दोघांनी आत्महत्या केली आहे. याबाबत पाटील म्हणाले, सेक्सटाॅर्शनप्रकारावपा पालकमंत्री म्हणून आढावा घेणार आहे.

महाविकास आघाडी सरकार पडण्यावर होणारी टीका होत आहे. जयंत पाटील, नाना पटोले, अजित दादा हे सातत्याने ‘ हे सरकार पडेल ‘ याबाबत बोलत आहेत. पण 100 दिवस झाले तरी सरकार सुरळीत चालू आहे. सरकारमधील काहीजण नाराज आहेत, असे बोलले जाते. पण नाराजांना मनवायची व्यवस्था भाजप आणि शिंदे गटाकडे आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार, विविध विभागांना त्यांच्या रिक्त जागांचा तपशील मागविला आहे, असे पाटील यांनी सांगितले.